“बेस्ट सोसायटी ”

संस्थे विषयक .....


सन १९०४ पासून भारतात सहकारी चळवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. भांडवलशाही, पठाणशाही व विषमता या विरुद्ध सहकार या नवीन तत्वज्ञानाचा विकास झाला. सन १९४१ – १९४२ या स्वातंत्र्यपूर्व काळात बेस्ट कंपनीतील एकूण ७८२ कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कंपनीचे तत्कालीन महाव्यवस्थापक श्री. ए. एस. ट्रॉलीप यांच्या सहकार्याने “दि बेस्ट कंपनी एम्प्लॉईज को.- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड” या पगारदार संस्थेची दिनांक १९ नोव्हेंबर १९४१ साली स्थापना केली. तत्कालीन बहुसंख्य भागधारक ट्राम कंपनीत कार्यरत होते. मुंबईतील वाहतूक सेवा “ट्राम कंपनी” मार्फत पुरविण्यात येत होती. सन १९४७ साली ट्राम कंपनी संपुष्टात आल्यामुळे “बेस्ट कंपनी” चे रुपांतर “बेस्ट अंडरटेकींग” मध्ये झाले व त्यानुसार “दि बेस्ट एम्प्लॉईज को.-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड” याप्रमाणे संस्थेच्या नावात बदल झाला. कै. फडणीस यांनी संस्थेचे पहिले सचिव पद भूषविले. .

संस्थेच्या सभासदांना बचतीची सवय लागावी तसेच कमी व्याज दराने त्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या आर्थिक गरजा भागविणे, यासाठी सभासदाला त्याच्या सभासदत्वाच्या अधीन राहून एकूण रुपये २० लाख कमाल कर्ज रक्कमेच्या मर्यादेपर्यंत दीर्घ मुदत कर्ज , अतिरिक्त कर्ज व शैक्षणिक कर्ज अल्प कालावधीत दिले जाते. संस्थेस होणाऱ्या नफ्यातून सभासद व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविणे ही सहकाराची उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन संस्थेचे कामकाज सुरु आहे. मुक्त आर्थिक युगात ना नफा - ना तोटा ही संकल्पना कालबाह्य झाली असली तरी संस्थेने नफ्यातील जास्तीत जास्त लाभ सभासदांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळवून देताना सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे.

सन १९५१ पासून सहकार क्षेत्रात जेव्हा पंचवार्षिक योजनांना सुरुवात झाली तेव्हापासून खऱ्या अर्थाने सहकारी चळवळीचे क्षेत्र विस्तारित होत गेले. बेस्ट उपक्रमाचा जसजसा विस्तार होत गेला, कर्मचारी संख्येत वाढ होत गेली, तसतसा संस्थेच्या सभासद संख्येत व आर्थिक भांडवलात देखील वाढ होत गेली. बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील बेस्ट आगारात १९४१ साली छोटेखानी जन्माला आलेल्या या पतपेढीने सहकाराचा मंत्र प्रामाणिकपणे जोपासत, सभासदांना सभासदाभिमुख, संगणीकृत सेवा देत, बेस्ट उपक्रमाच्या सहकार्याने संस्थेच्या आज सात शाखा, मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वमालकीची दोन भव्य कार्यालये तसेच सभासद व त्यांच्या कुटुंबियांसाठी लोणावळा येथे थंड हवेच्या ठिकाणी वातानुकूलित सर्व सुखसोयी संपन्न स्वमालकीचे सहा बंगले उभारून, संस्थेचा कणा आर्थिकदृष्ट्या भक्कम ठेवून एकूण ८१६ कोटींपेक्षा जास्त रक्कमेची वार्षिक आर्थिक उलाढाल करणारी व कायम “अ” वर्ग जोपासणारी, एकूण तीस हजार पेक्षा जास्त सभासद असणारी सहकार क्षेत्रातली एक अग्रगण्य पगारदार पतसंस्था आहे. मुंबई शहर व उपनगरातील जनतेला अहोरात्र अखंडित सेवा देणाऱ्या बेस्टच्या परिवहन व विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या एकमेव पगारदार पतसंस्थेने आता ८१ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. .